शहरातील शिवशंकर कॉलनीत भाड्याने घेतलेल्या दोन खोल्यांमध्ये तब्बल सव्वा सहा लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला आहे. एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिवशंकर कॉलनीतील रहिवासी सुखदेव आनदा व्यवहारे यांच्या मालकीच्या घर अडिच महिन्यापूर्वी शितल बाबुलाल बोरा(रा. अरिहंतनगर) याने भाड्याने घेतले होते. या गोडावूनमधून शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांना ठोकदरात मालाचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार इम्तियाज जलील यांनी गुरूवारी (दि. २१) दुपारी १ वाजेच्या सुमारास तेथे धाव घेतली आणि पोलिसांना बोलावून घेतले. यानंतर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने केल्या कारवाईत एकूण सहा लाख तीस हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.